Home चंद्रपूर  *आनंदवनातील दिव्यांग मुलांनी १००टक्के निकालाची परंपरा कायम राखली*

*आनंदवनातील दिव्यांग मुलांनी १००टक्के निकालाची परंपरा कायम राखली*

81

*यावर्षी दहावी परीक्षेत बसणारे सर्व ३२ दिव्यांग उत्तीर्ण*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : संधी निकेतन अंपगांची कर्मशाळा,आनंदवन येथील सर्व ३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत कर्मशाळेच्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
महारोगी सेवा समिती वरोरा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाला, आनंदवन येथे दिव्यांग व्यक्तिंना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नंबर फॉर्म) दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधेसह नियमित शिकवणी वर्ग ही घेतले जाते. यावर्षी २० कर्णबधिर व १२ अंध असे एकूण ३२ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली. परीक्षेला बसलेल्या ३२ पैकी २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विशेष म्हणजे १८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांहून अधिक गुण घेतले. यात कु.साक्षी डोईफोडे या कर्णबधिर विद्यार्थ्यांनीने ८२.२० टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर कु. निलाक्षी गद्देवार या अंध विद्यार्थीनींने ७२.२० टक्के गुण मिळवित सदर प्रवर्गात प्रथम क्रमांक घेतला.
व्यवस्थापकीय अधीक्षक रवींद्र नलगिंटवार यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात दहावी परीक्षा समन्वयक गणेश जायनाकर, प्रकल्प समन्वयक अश्विनी आंधळकर, विषय शिक्षक इकृमुद्दीन पटेल, रमेश बोपचे, आशीष येटे, कर्णबधिर शिक्षक सौरभ वानखेडे, मुख्याध्यापक विजय भसारकर,उमेश गुलाक्षे, प्रशांत गवई , परिक्षा व पूर्व तयारी करीता मुख्याध्यापक नवले, लोकमान्य विद्यालयाचे शिक्षक राखे आदींनी विशेष मेहनत घेतली. सदर यशाकरीता संस्थेचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ, मसेसचे विश्वस्त सुधाकर कडू , सदाशिव ताजने, माधव कवीश्वर आदी मान्यवरांसह आनंदवन वासियानी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले. पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.

Previous article*वरोऱ्याची प्रगती कायरकर शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात.*
Next articleवरोरा -भद्रावती – चंद्रपूर रेलवे प्रवासी संघ ने रेलमंत्री को भेजा पत्र.