Home चंद्रपूर  न.प. क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणारा नाला शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी!

न.प. क्षेत्रातील सांडपाणी वाहून नेणारा नाला शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी!

75

नाल्याचे पाणी वळविण्यासाठी मौजा वरोरा येथील पीडित शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा*: नगर परिषद क्षेत्रातील माढेळी रोड परिसरातील सांडपाणी वाहून नेणारा नाला परिसरातील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहराला लागून असलेल्या शेतजमिनीवर नगर परिषदेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पावसाळ्यात या नाल्यामुळे शेतात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना पिकाची तातडीने नुकसान भरपाई द्यावी आणि या नाल्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना प्रतिवर्षी फटका बसत असल्याने नाल्याचे सांडपाणी दुसरीकडे वळविण्यात यावे, अशा आशयाचे सविस्तर निवेदन मौजा वरोरा येथील पीडित शेतकऱ्यांनी सचिन बुरीले, प्रवीण तडस, संजय लोहकरे, राहुल देवडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
निवेदनात, पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करतांना शहरातील सांडपाणी नाल्याद्वारे बाहेर सोडण्याचे अनेक पर्यायी विकल्प नगर परिषदेकडे असताना नगर परिषदेने ते पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून जाणूनबुजून वळवले आहे. मौजा वरोरा परिसरात शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत. पावसाळ्यात शहरातील सांडपाणी नाल्याद्वारे मोठ्या प्रमाणात मौजा वरोरा ( वरोरा – तुळाणा मार्गावरील) शेतात येत असल्याने शेत ही तळी बनली आहे. त्यामुळे शेतात येण्याजाण्याचा मार्ग बंद झाला आहे. परिणामतः पेरणी पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे हा नाला नगर परिषदेच्या मालकी हक्काच्या जागेतून गेला नसून शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या शेतीतून गेला आहे. पावसाळ्यात नाल्याच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी नगर परिषदेने आवश्यक खबरदारी घेतली नसल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक, शारीरिक व मानसिक नुकसानीसाठी नगर परिषद पूर्णतः जबाबदार असल्याचा आरोप पीडित शेतकऱ्यांनी निवेदनातून लावला आहे. मौजा वरोरा येथील वरोरा शहरातील नाल्याच्या पाण्यामुळे शेतीचे व शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने नाल्याचे पाणी दुसरीकडे वळविण्यात यावे व शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
यांची प्रतिलिपि पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, राज्य मानवाधिकार आयोग, जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपजिल्हाधिकारी ( जमीन शाखा) उपविभागीय अधिकारी, वरोरा, मुख्याधिकारी वरोरा यांनाही देण्यात आली आहे.
निवेदनावर प्रवीण तडस, संजय लोहकरे, जगन ढाकणे, सचिन बुरीले, विठ्ठल देवगडे, उमाकांत उरकांडे, राजेंद्र कुरेकार, रामचंद्र उरकांडे, अविनाश कुरेकार, दिनकर फडके, वसंत धोपटे,भोलाशंकर गोवारदिपे इ.च्या स्वाक्षऱ्या आहेत.
Previous articleवरोरा येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
Next articleरसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘ एक डाव भटाचा ‘ नाट्यप्रयोग ठरला संस्मरणीय