Home बड़ी खबरें *इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक दशेला नवी दिशा देणार* – *मधु जाजू*

*इनरव्हील क्लबच्या माध्यमातून सामाजिक दशेला नवी दिशा देणार* – *मधु जाजू*

133

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा*: मागील ९५ पेक्षा अधिक वर्षापासून सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून आंतरराष्ट्रीय स्तरावर इनरव्हील क्लबचे कार्य अविरतपणे सुरू आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सशक्तीकरण, समाज कल्याण आदी क्षेत्रांत समाजकार्याचा नवा आदर्श ठेवला आहे. याच धर्तीवर क्लबच्या माध्यमातून सामाजिक दशेला नवी दिशा देणार, असे प्रतिपादन इनरव्हील क्लब ऑफ वरोऱ्याच्या नवनियुक्त अध्यक्षा मधु जाजू यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील ‘ ईशान प्लाझा ‘ सभागृहात इनरव्हील क्लब ऑफ वरोऱ्याचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी अध्यक्ष पदावर निवड झाल्यावर पदाधिकाऱ्यांना संबोधित करीत होत्या.
अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्षा कविता बाहेती होत्या. व्यासपीठावर मावळत्या अध्यक्षा सीमा बाहेती, सचिव अपूर्वा बुजोणे, नवनियुक्त सचिव वंदना बोढे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
जाजू पुढे म्हणाल्या की, संस्थेच्या ध्येयधोरणानुसार यापुढेही गरीब, गरजू व होतकरू व्यक्तींना यथोचित सहकार्य करण्यात येईल. मागल्या वर्षी घेतलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती देत यावर्षी महिला सशक्तीकरणाला आपले ध्येय बनवून बेरोजगार महिलांना रोजगार पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच, २० व्या नवीन पर्वात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात कविता बाहेती म्हणाल्या की, इनरव्हील क्लब ऑफ वरोरा ने आपल्या उत्कृष्ठ कार्याने शहरातच नव्हेतर आजूबाजूच्या जिल्ह्यातही नावलौकिक मिळविला आहे. इनरव्हील क्लबच्या पुढाकारातून राबविण्यात आलेले उपक्रम अत्यंत स्तुत्य व प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मावळत्या अध्यक्षा सीमा लाहोटी यांनी त्यांच्या कार्याचा व वर्षभरातील कार्यक्रमाचा आढावा सादर केला व या वर्षी उल्लेखनीय कामगिरीबद्दल मिळालेल्या पुरस्कारांची माहिती दिली.
मावळत्या सचिव अपूर्वा बुजोणे म्हणाल्या की, वरोरा तालुक्यात इनरव्हील क्लब २००२ पासून निरंतर लोकसेवेत अग्रेसर राहून समाजसेवेचा वसा सांभाळत आला आहे. शहराच्या एका चौकाला इनरव्हील नाव मिळणे क्लबसाठी मोठी उपलब्धी आहे, असे त्यांनी नमूद केले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत सन २०२० – २१ च्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. इनरव्हील क्लब ऑफ वरोरा कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी मावळत्या अध्यक्षा सीमा लाहोटी यांनी नूतन अध्यक्षा मधु जाजू यांना तर मावळत्या सचिव अपूर्वा बुजोणे यांनी नूतन सचिव वंदना बोढे यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. कार्यकारिणीत उपाध्यक्ष – दिपाली माटे, कोषाध्यक्ष – सुचेता पद्मावार, आय एस.ओ. – स्नेहल पत्तीवार, सीसी – जैनब सिद्धीकोट यांचा समावेश तर मार्गदर्शक समितीत निलिमा गुंडावार, माया बजाज, किरण जाखोटिया, पूनम जयस्वाल, प्रतिभा मणियार, सांक्षी उपलेंचवार यांचा समावेश आहे. मानद सदस्य म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर व उज्वला रायपूरकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी नवीन १० सदस्य अर्चना ठाकरे, चैताली देवतळे, दिपाली बावणे,शीतल पेचे, मानसी चिकनकर, संगीता घुगुल, प्राजक्ता कोहळे, हर्षदा कोहळे, वैशाली पदमावार, पूजा बोगावार यांचा इनरव्हील मध्ये प्रवेशित झाले. सर्वांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात नवीन पदाधिकारी यांना पिन व कालर घालून त्यांच्या पदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली .
सूत्रसंचालन निलिमा गुंडावार यांनी केले तर आभार दिपाली माटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व इनरव्हील सदस्यांनी सहकार्य केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Previous articleवेकोलि का ट्रांसफार्मर खराब करोड़ो का नुकसान।
Next articleवेकोलि माजरी के नागरिकों को बिजली का झटका.