Home चंद्रपूर  *विहिरीत पडलेल्या वाघाने रेस्क्यू टीमला चकमा देत जंगल गाठल्याने वनविभागाने सोडला सुटकेचा...

*विहिरीत पडलेल्या वाघाने रेस्क्यू टीमला चकमा देत जंगल गाठल्याने वनविभागाने सोडला सुटकेचा निश्वास*

101
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : तालुक्यातील आल्फर परिसरात चितळचा पिछा करताना शेतातील विहिरीत पट्टेदार वाघ पडला. सकाळी सहा वाजताच्या सुमारास बैलाला पाणी पाजण्याकरीता विहिरीकडे आलेल्या शेतकरी संजय सरपाते यांना वाघ दिसल्याने त्यांनी तात्काळ याची सूचना वनविभागाला दिली. वाघाला पकडण्यासाठी चंद्रपूर वरून रेसक्यु टीमला पाचारण करण्यात आले. वाघाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढत असताना शांत असलेल्या वाघाने रेस्क्यू टीमला चकमा देत अचानक विहीरीबाहेर उंच झेप घेऊन पळ काढला व बाजूच्या शेत शिवारात लपून बसला. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण होते. अनेक तासांच्या शोधाशोधीनंतर जंगलाच्या दिशेने वाघ निघून गेल्याने वन विभागाने सुटकेचा निश्वास सोडला.
अधिक माहितीनुसार वरोऱ्यापासून जवळपास ३० कि.मी. अंतरावर आल्फर गाव परिसराला लागून संजय सरपाते यांचे शेत आहे नित्यनियमाप्रमाणे सकाळी सहा वाजताच्या सुमारास ते आपल्या बैलाला पाणी पाजण्यासाठी विहीरीवर गेले असता विहिरीत पट्टेदार वाघ पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच त्याची सूचना शेगाव बीटचे फोरेस्टर किशोर देऊळकर यांना दिली. देऊळकर यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती दिली असता चंद्रपूरची एक रेस्क्यू टीम वाघाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी निघाली. दरम्यान तालुक्यातील लोकांना याची माहिती मिळताच मिळेल त्या साधनाने तीन चार हजार लोक घटनास्थळी जमा झाले. वाघाला पाहण्याच्या नादात बघ्या लोकांनी संबंधित शेतकऱ्यांचे चना, पराटीचे पीक पायदळी तुडविले. तसेच अन्य शेतकऱ्यांच्या पिकाचेही अतोनात नुकसान केले.
रेस्क्यू टीम सचिन सरपाते यांच्या शेतात आल्यानंतर त्यांनी नियोजन पद्धतीने खाटेला दोरी बांधून ती विहिरीत सोडली जेणेकरून वाघ खाटेवर बसून वर येईल. यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) डॉ. खोब्रागडे यांना ही प्रामुख्याने पाचारण करण्यात आले होते. सकाळी ११.०० वाजता दरम्यान रेस्क्यू कार्य सुरू असताना विहिरीतून थोडा वर निघाल्यानंतर वाघ शांत होता. त्यामुळे रेस्क्यू टीमवाले थोडे गफलतीत राहीले. याचा लाभ घेत व स्वत:ला सावरत समोर काठ दिसताच वाघाने उंच झेप घेऊन विहीरीच्या बाहेर उडी मारून पळ काढला. हे इतक्या क्षणात घडले की तिथे जमलेल्या काही सूचले नाही. वाघाने तिथून पळ काढून बाजूच्या शेतशिवारात तळ ठोकला त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत दहशत पसरली. शेतकऱ्यांचे बैल, वासरू गोठ्यात होते परंतु वाघाच्या भीतीने कोणीही शेतात जाण्यास धजावत नव्हता शेतातील इतर कामेही ठप्प झाली होती. वाघ पळून गेल्याने रेस्क्यू टीमही माघारी परतली. दरम्यान वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड व कर्मचारी मात्र तेथेच थांबले होते. शेतात वाघ असल्याने गावकऱ्यांचा रोष वाढत असताना मागील काही दिवसांपासून वाघाचा परिसरात वावर शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनलेला होता. वनविभाग लक्ष देत नसल्याची तक्रार गावकरी करीत होते. त्यात शेतशिवरात वाघ लपून बसल्याने वनविभागाच्या भूमिकेला धरून गावकऱ्यांच्या रोष वाढत होता. वाघाला शेतातून बाहेर जंगलात घालवण्याची हमी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांनी दिली व गावकऱ्यांच्या मदतीने वाघाचा शोधाशोध सुरू केली. फटाखे फोडून वाघाला बाहेर काढण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, फारेस्टर देऊळकर, रामटेके, लडके, डोर्लीकर, वनकर्मचारी, एनजीओ पदाधिकारी, आदींनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे अखेर वाघ शेतशिवाराची जागा सोडून जंगलाच्या दिशेने निघून गेला. त्यामुळे वनविभागाने सुटकेचा निश्वास सोडला.
——————————————————
शेगांव बिट वाघाची टेरीटोरी असून संबंधीत वाघ हा तीन ते साडेतीन वर्षांचा नर आहे. तो आपली टैरीटोरी सोडून बाहेर जाऊ शकत नाही.
वरोरा वनपरिक्षेत्रात शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास ते वनविभागाला कळवितात व वनविभागाच्या वतीने शक्य तितकी मदत करण्यात येते.
आज साखरा बीट उपक्षेत्र शेगांव आल्फर गाव परिसरात सरपाते यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्यानंतर तो पाहण्यासाठी हजारो लोकांनी केलेल्या गर्दीत संबंधित शेतकरी व अन्य काही शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.त्या संबधात वरिष्ठांना कळवून शासनाच्या नियम व निर्णयानुसार सर्व ती मदत करण्यात येईल.
*श्री राठोड*
वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा
—————————————————–