Home चंद्रपूर  *’ रंगुनी रंगांत साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा...

*’ रंगुनी रंगांत साऱ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ‘ ची अनुभूती . .*

61

*दिव्यांग कलाकारांच्या सप्तसुरांची रसिकांवर मोहिनी, स्वरानंदवनच्या वर्धापनदिनास चार चाँद*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : दिव्यांगाच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनासाठी एक दीपस्तंभ ठरलेल्या ‘ स्वरानंदवन ‘ मंचाच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संगीतमय कार्यक्रमात दिव्यांग कलाकारांनी उपस्थित रसिकांवर सप्तसुरांची बरसात करीत अक्षरशः मोहिनी घातली.परिणामतः वर्धापन दिन कार्यक्रमाला चार चांँद लागले . महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित स्वरानंदवनच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम रसिकांनी तुडुंब भरलेल्या आनंदवनातील स्वरानंदवन सभागृहात जोशपूर्ण वातावरणात शानदाररित्या साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, डॉ.भारती आमटे, समितीच्या अंतर्गत व्यवस्थापिका पल्लवी आमटे, सीतारमण लेप्रसी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पोळ, संगीतकार डॉ. मनीष उपाध्ये, अंजली उपाध्ये, स्वरानंदवनचे मुख्य व्यवस्थापक सदाशिवराव ताजने, स्वरानंदवनाच्या संगीत शिक्षिका रसिका करमाळेकर उपस्थित होत्या .
प्रमुख मार्गदर्शनात डॉ. विकास आमटे म्हणाले की, ‘ स्वरानंदवन ‘ एक कलात्मक आविष्कार असून , इथे वेदनेचा हुंकार अन् सुरेल सौंदर्याचा मधुर झंकार अनुभवायला येतो. ते पुढे म्हणाले, स्वरानंदवन उपक्रमाच्या निर्मितीचे मूळ हे समाजाने या वंचितांना दिलेल्या नकारांमध्ये दडलेले आहे. स्वरानंदवन हा समाजापासून दुरावलेल्या लोकांचा समूह असून तो एक प्रकारचा पुनर्सामाजिकरणाचा प्रयोग आहे. सदर उपक्रमासाठी अनेक मान्यवरांची मोलाची साथ लाभली असे सांगत यात स्वरानंदवनाचे मुख्य व्यवस्थापक सदाशिवराव ताजने यांच्या अपार कष्ट आणि समर्पणाचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.
अनेक वर्षांपूर्वी वरोरा येथील थिएटरमध्ये कुष्ठबाधित लोकांसाठी सिनेमाचा एक शो आयोजित करण्यात आला होता. मात्र, आनंदवनातील कुष्ठबाधित सिनेमा बघून गेल्यानंतर लगेच थिएटर धुऊन काढण्यात आल्याचं शल्य मनाला टोचत होतं. त्यामुळे या नकारात्मकतेतून स्वरानंदवनाचा पाया रचल्या गेला आणि त्याने इतिहास घडविला आहे,असे त्यांनी अभिमानाने नमूद केले.
यावेळी पल्लवी आमटे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकात सदाशिवराव ताजने म्हणाले की, स्वरानंदवन हा आनंदवनाचा सार आहे. स्वरानंदवन प्रकल्पाची संकल्पना, मार्गदर्शन, प्रेरणा डॉ. विकास आमटे यांची आहे. त्यांच्यामुळे आजपर्यंत गोवा, दिल्ली, आंध्र प्रदेश, महाराष्ट्रभर ३ हजार प्रयोग आम्ही करू शकलो. सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी डॉ. विकास आमटे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम लेह, लडाख व कारगिल मध्ये करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्वरानंदवन प्रकल्पचा उद्देश शिक्षण, प्रशिक्षण व पुनर्वसन आहे. त्यामुळे आजपर्यंत हजारो दिव्यांग व कुष्ठमुक्तांना नवी दिशा मिळालेली आहे. आजपर्यंत हजारो आंतरजातीय व आंतरव्यंग लग्न या माध्यमातून करण्यात आले आहेत. स्वरानंदवनला अमेरिका, हॉलंड, दुबईहुनही बोलावणे आले असून लवकरच आम्ही त्याची तयारी करू, असे ताजने यांनी स्पष्ट केले.
सुरूवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर स्वरानंदवनच्या कलाकारांनी केक कापून २१ वा वर्धापन दिन थाटात साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिव यांनी केले.
स्वरानंदवन संगीतमय रजनी कार्यक्रमाची सुरुवात खुशाली जांभुळकर यांनी ‘ नमामि श्री गणराज दयाल ‘ या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने केली. उज्वला गायगवळी यांनी ‘ कधी तरी हे मेघे जमावी माझ्यासाठी ‘, ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा ‘, हे गीत सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. अमोल गोरडे यांनी ‘ म्यानातून उसळे तलवारीची पात ‘, सविता गोरडे यांनी ‘ ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे ‘, हे गीत सादर करून कार्यक्रमात रंगत आणली ‘ बहिणाबाई वांढरे यांनी ‘ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी ‘, सुषमा तेलंग यांनी ‘ आभाळाचे गर्द निळेपण या डोळ्यांना यावे ‘, हे गीत सादर करून टाळ्या घेतल्या. रसिका करमाळेकर यांचे ‘ रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा ‘ हे गीत रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले. संगीतमय कार्यक्रमात स्वरानंदवनच्या कलाकारांनी भजन,गजल, भावगीत अशी एकाहून एक सरस गाणी सादर केली. त्याच्या प्रत्येक गाण्याला उपस्थित रसिकांकडून उत्तरोत्तर जोरदार टाळ्यांची दाद मिळत गेली .
स्वरानंदवनाच्या कलाकारांना शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षण देणाऱ्या रसिका करमाळेकर यांचा यावेळी आनंदवननिर्मित भेटवस्तू देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन रसिका करमाळेकर यांनी केले. की बोर्ड, हार्मोनियमवर नाना कुळसंगे, तबल्यावर नरेश चांदेकर, ढोलकीवर बंडू तेलंग, मायनरवर सुनील देशमुख यांनी अप्रतिम साथसंगत केली.
कार्यक्रमाला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार, संधी निकेतन कर्मशाळेचे अधीक्षक रवींद्र नलगंटीवार, सामाजिक कार्यकर्ते राजेश ताजने, मुख्याध्यापिका विद्या टोंगे, विजय भसारकर, सेवकराम बांगडकर, प्रमोद बक्षी, डॉ. प्रवीण मुधोळकर, आणि परिसरातील सर्व शाळांतील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि आनंदवनातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next articleलाल नाला डैम के पांच गेट खोले !