Home चंद्रपूर  *वरोरा तालुक्यातील विविध कृषी विस्तार कार्याची पाहणी*

*वरोरा तालुक्यातील विविध कृषी विस्तार कार्याची पाहणी*

86
*विभागीय कृषी सहसंचालक, नागपूर येथील तंत्र अधिकारी यांचेकडून प्रगतशील शेतकरी गरमडेचा सत्कार*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय, नागपूर येथील तंत्र अधिकारी ( गुण नियंत्रण) संदिप पवार यांनी नुकतीच वरोरा तालुक्यातील शेगांव मंडळ अंतर्गत येणाऱ्या शेगांव (बु.), वडधा माल, वायगाव (भो.) इ. गावांना तथा प्रगतशील शेतकरी यांच्या शेतात भेट दिली तसेच क्षेत्रातील विविध विस्तार कार्याची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन सूचना दिल्यात.
तालुक्यातील विविध विस्तार कामाची तपासणी करताना संदीप पवार यांनी सोयाबीन ग्रामबीजोत्पादन अंतर्गत शेतकरी प्रमोद हिवरे, (पोहे), ईश्वर वाभीटकर, सुरेश गरमडे, वायगाव भोयर, आदींनी पुढील हंगामा करिता साठवणूक करून ठेवलेल्या हजारो क्विंटल सोयाबीन साठ्याची तपासणी केली. यावेळी त्यांनी उत्पादित सोयाबीनला स्पारल सेपरेटरच्या माध्यमातून प्रत्यक्ष गाळणी करून उत्तम प्रतीचे बियाणे विक्री साठी साठवणूक करावी व विक्रीपूर्वी उगवण क्षमता तपासणी करूनच बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावे, अश्या सूचना केल्या.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या दिल्ली स्थित वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणने वायगाव भोयर या गावातील प्रगतशील शेतकर सुरेश बापूराव गरमडे यांना त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन अंगिकारून सोयाबीनचे एसबीजी – ९९७ हे वाण विकसित केल्याबद्दल वाणाला मान्यता देऊन कायदेशीररित्या शिक्कामोर्तब करीत हक्क नोंदणी प्रमाणपत्र बहाल केल्याने नागपूर विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या कार्याचा सत्कार संदीप पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तसेच त्यांच्या शेताला प्रत्यक्ष भेट देवून उन्हाळी सोयाबीन लागवडाची पाहणी केली. तसेच एमआयडीएच अंतर्गत वडधा माल येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग झाडे यांच्या कडील कांदा चाळ – २० मे.टन ची तांत्रिक तपासणी करून कांदा उत्पादन वाढीसाठी उपयुक्त सूचना केल्या. सोबतच त्यांच्याकडील हळद काढणी प्रकिया,फुले संगम या वाणाची उन्हाळी सोयाबीन लागवड, गांडूळ खत प्रकल्प इ.ची पाहणी व तपासणी केली. मंडळ कृषी अधिकारी शेगाव (बु.) अंतर्गत शेतकरी उपयोगी विविध उपक्रमाची माहिती संबंधित कृषी अधिकारी यांचेकडून जाणून घेतली व समाधान व्यक्त केले.
या संपूर्ण भेटी दरम्यान तालुका कृषी अधिकारी गजानन भोयर, कृषी अधिकारी पंचायत जयंत धात्रक, मंडळ कृषी अधिकारी विजय काळे , क्षेत्रीय कर्मचारी लता दुर्गे, पवन मडावी व पवन मत्ते इ.दीं उपस्थित होते.
Previous article*छ. शिवाजी महाराज व बाळशास्त्री जांभेकर यांची संयुक्त जयंती साजरी*
Next article*२८ फेब्रुवारीला श्री शिवशंकराच्या मुर्तीची पुनर्स्थापना व प्राणप्रतिष्ठा*