Home बड़ी खबरें *विनापरवानगी शेतातील गौण खनिजांची वाहतूक करणे बेकायदेशीर* – *तहसीलदार...

*विनापरवानगी शेतातील गौण खनिजांची वाहतूक करणे बेकायदेशीर* – *तहसीलदार प्रशांत बेडसे*

211
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : शेतीमध्ये भूसुधारणा करताना अथवा विहीर खोदकामानंतर त्यातून काढलेल्या गौण खनिजांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करताना महसूल विभागाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक असून विनापरवानगी वाहतूक करणे बेकायदेशीर असल्याने असे कृत्य करणाऱ्यास मोठ्या दंड वसुलीच्या कारवाईला सामोरा जावे लागेल, असा इशारा तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी आज येथे दिला.
बेडसे पुढे म्हणाले की, क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांना अनेक वेळा क्षेत्रभेटी दरम्यान शेतकरी आपल्या शेतामध्ये भूसुधार करण्यासाठी किंवा विहीर खोदताना बाहेर काढण्यात आलेली माती, मुरूम, दगड, गोटे यांची वाहतूक करताना दिसून येतात. याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार एका गट नंबर मधील माती, मुरूम, दगड, गोटे आणि इतर कोणतेही गौण खनिज त्या गटाच्या क्षेत्राबाहेर वाहून न्यायचे असेल तर त्याची महसूल विभागाकडून रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. सदर परवानगी न घेतल्यास अशा प्रकारची वाहतूक ही अवैध मानली जाऊन त्यावर मोठा दंड होण्याची शक्यता निर्माण होते. असे होऊ नये आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतीमध्ये आवश्यक भूसुधारणा करणे शक्य व्हावे म्हणून ज्यांना आपल्या वरील प्रमाणे शेतीच्या कामासाठी माती, मुरूम, दगड, गोटे यांची एका गटातून दुसऱ्या गटात वाहतूक करावयाची असेल तर त्यांनी परवानगीसाठी तहसील कार्यालय वरोरा येथे अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर ७ दिवसांच्या आत तात्काळ तपासणी करून परवानगी दिली जाईल. त्यासाठी शासन निर्णयानुसार स्वामित्व धन सरकारी तिजोरीत जमा करणे आवश्यक राहील. तसेच ज्या शेतकऱ्यांना जवळच्या तलावातून गाळ काढून आपल्या शेतात टाकावयाचा असेल त्यांनी अर्ज सादर केल्यास स्थळ पाहणी करून कार्यालयातर्फे त्यांना तात्काळ परवानगी दिली जाईल. परवानगीसाठी कोणतेही स्वामित्व धन आकारले जाणार नसल्याने शेतकऱ्यांनी परवानगी घेऊनच भूसुधारणा करावी, प्रशासनातर्फे सर्वतोपरी साहाय्य केले जाईल, असे प्रशांत बेडसे यांनी आश्वस्त केले.
Previous article*राज्य को 4 फेज में अनलॉक करने की तैयारी*
Next articleशराब बंदी हटते ही घुग्घुस में तीन करोड़ का माल नष्ट।।