Home चंद्रपूर  *संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावरहित जीवन ही निरोगी हृदयाची त्रिसूत्री* – *डॉ....

*संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावरहित जीवन ही निरोगी हृदयाची त्रिसूत्री* – *डॉ. प्रतीक दारुंडे*

90

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : अविवेकी जीवनशैली हे हृदयाशी संबंधित आजार उद्भवण्याचे सर्वात मोठे कारण असल्याने संतुलित आहार, नियमित व्यायाम व तणावरहित जीवन ही निरोगी हृदयाची त्रिसूत्री सर्वांनी अंगीकारावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक दारुंडे यांनी केले. येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक हृदय दिन सप्ताहाच्या निमित्ताने डॉ. अंकुश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्षीय मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालयातील दंतशल्य चिकित्सक डॉ. राहुल पिंपळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. झाकीया खान, चीफ नर्सिंग ऑफीसर वंदना बरडे उपस्थित होते. डॉ. दारुंडे पुढे म्हणाले की, हृदयरोगाबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी २७ सप्टेंबरला जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. हृदय रोग टाळण्यासाठी गरजेपेक्षा जास्त साखर – मीठ, चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन तसेच कोणत्याही गोष्टीचा ताण घेणे बंद करायला हवे असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. डॉ. राहुल पिंपळकर म्हणाले की, जागतिक आकडेवारीनुसार जगात ह‌दय विकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. लोकांनीं त्यांच्या आजाराची काळजी घ्यावी. आपल्या दिनचर्येत आमुलाग्र बदल घडवून दररोज किमान अर्धातास व्यायाम, आहारात कडधान्य व फळभाज्यांना प्राधान्य व तणावमुक्त जीवन जगावे, यामुळे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, असे आवर्जून सांगितले. वंदना बरडे यांनी आपल्या मनोगतात हृदयरोग व पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले. त्या म्हणाल्या की, असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धुम्रपान, मधुमेह,उच्च रक्तदाब, स्थुलता, ही हृदयविकाराची महत्वाची कारणे आहेत. हृदयरोगावर प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जीवनशैलीत परिवर्तन करणे नितांत गरजेचे आहे.
डॉ. झाकीया खान यांनी जागतिक हृदयदिना विषयी माहिती देऊन हृदयाचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले व इतरांनाही प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.
गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन शक्ति गीताने सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नर्सिंग ऑफीसर किरण धांडे यांनी केले. सूत्रसंचालन समुपदेशक नेहा इंदूरकर यांनी तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ तनिष्का खडसाने यांनी आभार मानले. कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारीवृंद व सुजाण नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous article*सदभावना एकता मंच समाजाला दिशा देणारा ठरणार* – *आ. प्रतिभा धानोरकर*
Next article*कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वरोरावासियांचे सहकार्य आवश्यक* – *आयुष नोपाणी*