Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना अटक

47

आरोपींना ४ दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड @

वरोरा पोलिसांची चमकदार कामगिरी @

*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : बेपत्ता प्रकरणाचा तपास करीत असतांना एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश येथील उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी (भा.पो.से.) यांनी केल्याने पोलिसांच्या या चमकदार कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून सदर सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
*अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारे ११ आरोपी अटकेत*

अल्पवयीन मुलीला पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारात जबरदस्तीने ओढणाऱ्या प्रौढ युवक – युवती व अल्पवयीन मुलीशी ग्राहक म्हणून तिचे इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या शहरातील विविध भागातील ९ आरोपींवर वरोरा पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्र.६२६/२०२३ कलम ३६३, ३७० (अ) ३७६, ३७६ (२) एन ३७६ (३) भादंवि सहकलम ४,६, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ सहकलम ३, ४, ५, ६ स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वात अधिक तपासासाठी ८ जणांची एसआयटी टीम गठीत करण्यात आली असल्याची माहिती मुख्य तपास अधिकारी नोपानी यांनीच पोलीस स्टेशन आवारात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

*मागील अनेक दिवसांपासून चालू होते लैंगिक अत्याचार*
याबाबत अधिक वृत्त असे की, सदर गुन्ह्यातील अल्पवयीन गरीब पीडित मुलगी पारिवारिक सदस्यांना सोडून काही दिवसांपूर्वी आपल्या घरातून बाहेर निघाली होती. वरोरा शहरात आल्यानंतर आरोपी मुलीची नजर तिच्यावर पडली. तीने अल्पवयीन पीडित मुलीला आपल्या घरी ठेवून घेतले. त्यानंतर या गुन्ह्यातील दुसरा दलाल आरोपी याने पीडित मुलीला देहव्यापार करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले. तिने नकार दिल्यानंतर दोन्ही वयस्क आरोपींनी संगनमताने पैशाचे आमिष दाखवून देह विक्री करण्यास बाध्य केले. तद्नंतर सदर आरोपी मुलगी व दलाल आरोपी हे दोघे इतर अटक आरोपींशी संपर्क करून त्यांच्याकडून रक्कम घेऊन पीडितास देहविक्री करण्यास व ग्राहकासोबत जाण्यास भाग पाडत असे. आरोपीसोबत पीडिताला पाठविल्यानंतर ते पीडीत मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होते, असे कळते. यातील आरोपींकडून वारंवार होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून पीडित मुलीने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविल्याने आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एक आरोपी अन्य गुन्ह्यात कारागृहात असल्याचे समजते. बाकीच्या सर्व आरोपींना विशेष न्यायाधीश तथा अपर सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टात पेश केल्यावर त्यांना घटनेचे गांभीर्य पटवून दिल्यावर न्यायाधीशांनी आरोपींना ४ दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड सुनावला. तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणात सरकारी अधिवक्ता गोविंद उराडे यांनी महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली
*शहरात देह व्यापाराचा धंदा जोरात*
पोलिसांनी शहरात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्या नंतर तालुक्यात सेक्स रॅकेट चालविणारी टोळी सक्रिय असल्याचे समजते. कमी वेळात जास्त पैशा कमविण्याच्या नादात शहरात काही हॉटेल, लॉजवाले मोठ्या शहरांतून शिताफीने मोठ्या संख्येने कॉलगर्ल्स वरोरा शहरात पोहचवत असल्याचे कळते. त्यातल्या त्यात पैशांच्या आमिषाने ग्रामीण शहरी भागातील मुली या गोरखधंद्यात ओढल्या गेल्या आहेत. बाहेरुन आलेल्या कॉलगर्ल्सना इच्छित ठिकाण्यावर पोहचवणे, बडदास्त ठेवत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणे, इ. कामे लोकल दलाल करतात. त्या बदल्यात लोकल दलालही ग्राहकांकडून मोठी राशी उकळतात. शहरात या हरामखोरांचा नेटवर्क मोठा असल्याचेही बोलले जाते. पोलिसांनी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केल्यानंतर या व्यवहारात सक्रिय असणाऱ्या पांढरपेशा व्यक्तींचे धाबे दणाणले असून शहरातील अशा हॉटेल, लॉजवर नजर ठेवल्यास पोलिसांना यापेक्षा मोठे आसामी सापडू शकतात, असे मत सर्वसामान्य जनता व्यक्त करीत आहे.
Previous articleरसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘ एक डाव भटाचा ‘ नाट्यप्रयोग ठरला संस्मरणीय
Next article१५ ऑगस्टला चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या वरोरा येथील कलादालनात स्वरक्ताने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन.