*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : सिकलसेल हा अत्यंत गंभीर व अनुवांशिक आजार आहे. यात रुग्णाच्या पेशीचा आकार विळ्या सारखा होतो. आई आणि वडील दोन्ही सिकलसेल ग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक पीडित व्यक्तींनी एकमेकांशी विवाह करु नये, असा हितोपदेश वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल खुजे यांनी येथे केला. सितारमण लेप्रसी हॉस्पीटल आणि ग्राम पंचायत आनंदवन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांसाठी आनंदवनातील गोकुळ सभागृहात सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सितारमण लेपर्सी हॉस्पीटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ विजय पोळ हे उपस्थित होते.
कार्यक्रमात तालुका वैद्यकीय अधिकारी बाळ मुंजनकर, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू, सरपंच रूपवंती दरेकार, ग्रामसेविक विद्या गिलबिले, वैद्यकीय अधिकारी डॉ.शेख प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. खुजे पुढे म्हणाले की, सिकलसेल या गंभीर आजारात रुग्णात रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. सरकारी रुग्णालयात सिकलसेल रुग्णांसाठी आवश्यक औषधोपचार करण्यात येतो. त्याच्यासाठी शासनाच्या विविध योजनाही आहेत. सिकलसेल निर्मुलनासाठी जनजागृती आवश्यक आहे. त्यादृष्टीने शासनाच्या वतीने सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
डॉ. मुंजनकर यांनी आपल्या मनोगतात सिकलसेल रुग्णांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनाची सविस्तरपणे माहिती दिली.
सुधाकर कडू यांनी ‘ जीवण सुंदर आहे ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना संत रामदास यांच्या ” जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तूच शोधुनी पाहे ” या ओव्याच्या उदाहरणाने सुखी जीवनाचे सार पटवून दिले. ते म्हणाले कीे दुःख ज्याला त्याला असते. आपल्याला वाटते त्यापेक्षाही खोल, अधिक गहिरे दुःख आपल्या आसपासच्या लोकांना असत. आनंदवनात याचा प्रत्यय येतो. काही लोकं कितीही वेदना असल्या तरी देखील सतत हसतमुख असतात. अशा हसऱ्या लोकांच्या जीवनातही कधी डोकावून पाहा. किती मोठमोठ्या संकटांचा सामना ते करीत असतात. माणसाने केवळ क्षुल्लक दुःखाने व्यथित होऊन त्याचा शोक करीत बसू नये. जीवन ही मानवाला लाभलेली अमोल देणगी आहे, जीवण हे सुंदर आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. पोळ यांनी सिकलसेल रुग्णांना माहित झालेल्या योजनांचा अवश्य लाभ घ्यावा, त्यासाठी आम्ही योग्य मार्गदर्शन करु असे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रोजेक्टर द्वारे सिकलसेल बाबत संपूर्ण माहितीचा व्हिडिओ दाखविण्यात आला. प्रसंगावधान दाखवून रुग्णांचे प्राण वाचविण्यात यशस्वी ठरलेल्या सितारमण लेप्रसी हॉस्पीटलचे डॉ. कृष्णा कुळधर व किर्ती लोहकरे यांच्या कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमात शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात डॉ. टिवंकल ढेंगळे, डॉ. सिष्टी मंत्री, डॉ. ऋषिकेश गावंडे, डॉ.शिवानी बट्टूलवार, कपिलदेव कदम, स्वराज वाळके, पूनम धांडे, सविता घाटे, माया रंदई, शैला दुर्गे, वेणू किन्नाके, आदींची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कृष्णा कुळधर यांनी केले. संचालन किर्ती लोहकरे हिने तर आभार संदीप गणवीर यांनी मानले.
कार्यक्रमात ग्राम पंचायत आनंदवन चे सर्व सदस्य, सितारमण लेपरसी. हास्पीटल चे कर्मचारी गण, परिसरातील सिकलसेल रुग्ण, ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.

Previous article*गूरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न*
Next article*विद्यार्थ्यांनो स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर करिअर घडवा* – *किशोर टोंगे*