Home चंद्रपूर  *लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारांनी विश्वासार्हता, नीतिमत्ता जोपासावी* — *सुधाकर कडू*

*लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी पत्रकारांनी विश्वासार्हता, नीतिमत्ता जोपासावी* — *सुधाकर कडू*

95
*वरोरा* – आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी लोककल्याण व ज्ञानप्रसार ही उद्दिष्ट्ये समोर ठेवून अन्याय, अत्याचार, जुन्या रूढी, वाईट परंपरा, भाकड कथा निर्मूलनासाठी ‘ दर्पण ‘ हे वृत्तपत्र सुरू केल्याने व तो वारसा त्यावेळी प्रकर्षाने जोपासल्या गेल्याने पत्रकारितेबद्दल आदरयुक्त दरारा होता. परंतु हल्ली मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर भांडवलदारांची मक्तेदारी निर्माण झाल्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही, यासाठी पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांचे बटीक न बनता तसेच कोणत्याही आमिषाला बळी न पडता विश्र्वासार्हता व नीतिमत्ता जोपासल्यास लोकशाही बळकट होईल, असे परखड प्रतिपादन महारोगी सेवा समिती, आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी केले. वरोर्‍यातील ओशनिक बहुउद्देशीय संस्था, आनंदवन मित्र मंडळ, व आनंदम् मैत्री संघ, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ पत्रकार दिन ‘ सोहळा श्रीनगर सिटी, बोर्डा येथील ओशनिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयात नुकताच शानदाररीत्या संपन्न झाला. त्यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार शाम ठेंगडी, आनंदम् चे महाराष्ट्र समन्वय डॉ. वाय एस जाधव प्रामुख्यानेे उपस्थित होते.
कडू पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या पत्रकारांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. बातमीसाठी आपला वेळ, श्रम, बुद्धी खर्च घालूनही त्यांना मानधनही मिळत नाही, हे ऐकूण आश्चर्य होते. समाजाचा आरसा म्हणून कार्य करणारे पत्रकारिता क्षेत्र हे एक प्रकारे ‘ थॅक् लेस जॉब ‘ आहे, असे ते म्हणाले. आयोजकांचा उपक्रम सामाजिक बांधीलकी जपणारा, स्तुत्य व अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मर्दाने म्हणाले की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते. त्यांची खरी जन्मतारीख दि.२० फेब्रुवारी १८१२ असल्याचे नमूद करीत त्यांनी त्यांच्या जीवनकार्याचा नेटक्या शब्दात आढावा घेतला.
प्रा. शाम ठेंगडी यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरुपाचे अभ्यासपूर्ण विवेचन केले.
यावेळी डॉ. वाय. एस. जाधव, प्रदीप कोहपरे, रोहीत फरताडे, डॉ. मुधोळकर यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले. यावेळी मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते १० कर्तबगार पत्रकारांचा सत्कार करण्यात आला तसेच सामाजिक कार्यकर्ता राहुल देवडे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात रोटरी क्लबचे सचिव बंडू देऊळकर, बोर्डा ग्राम पंचायतचे सदस्य उमेश देशमुख, रवींद्र देसाई, उपसरपंच राहुल ठेंगणे, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने, आनंदवन मित्र मंडळ, वरोऱ्याचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, आनंदवनचे कार्यकर्ते राजेश ताजने, रोहीत फरताडे, पत्रकार प्रवीण गंधारे, प्रदीप कोहपरे, विनोद शर्मा, चेतन लुतडे, सारथी ठाकूर, खेमचंद नेरकर, सामाजिक कार्यकर्ते मयूर दसूडे व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले. राजेंद्र मर्दाने यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल देवडे, संजय गांधी, शाहीद अख्तर, प्रा.बळवंत शेलवटकर, ओंकेश्वर टिपले, शरद नन्नावरे, सोनू बहादे, मयंक जाधव, यश राठोड इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
Previous article*रिषभ रट्टे यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने केला साजरा*
Next articleमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ‘ दर्पण दिन ‘ साजरा*