Home चंद्रपूर  *वरोरा वनपरिक्षेत्रातील पोतरा नदीच्या पात्रात वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ*

*वरोरा वनपरिक्षेत्रातील पोतरा नदीच्या पात्रात वाघ मृतावस्थेत आढळल्याने खळबळ*

60

*वाघाचा मृत्यू संशयास्पद असल्याच्या चर्चेला उधाण*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा*: चंद्रपूर – वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील पोतरा नदीपात्रात एक वाघ (नर) मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . ही घटना शनिवारी दुपारी ४.०० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. संबंधित अधिकाऱ्यांनी मौका पंचनामा करून मृत वाघ शवविच्छेदनासाठी टीटीसी चंद्रपूर येथे पाठविले असून अधिक तपास वनविभाग करीत आहे.
अधिक माहितीनुसार चंद्रपूर (वरोरा) – वर्धा ( हिंगणघाट) सीमेवरील पोतरा नदीपात्रात शनिवारी ४.०० वाजताच्या सुमारास वाघ मृतावस्थेत आढळला. ज्या ठिकाणी वाघ मृतावस्थेत आढळला ती जागा वनपरिक्षेत्र हिंगणघाटच्या अखत्यारीत आहे की वरोऱ्याच्या, असा संभ्रम सुरुवातीला निर्माण झाला. या विषयावर बराच खल झाल्यानंतर घटनास्थळ वरोरा वनपरिक्षेत्रात असल्याचे कळले. शेवटी वर्धा व वरोरा वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून संयुक्त पंचनामा केला. घटनास्थळ मुख्य मार्गावरून आत असल्याने वाघाला तिथून काढण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. शेवटी, रात्री उशिरा शवविच्छेदनाकरिता मृत वाघ टीटीसी, चंद्रपूरला रवाना करण्यात आले. वाघ नदीपात्रात मृतावस्थेत आढळून आल्याने सदर प्रकरणाविषयी वेगवेगळ्या चर्चांना उत येऊन ग्रामस्थांकरवी संशय व्यक्त करण्यात येत आहे.काहींच्या मते ‘ करंट ‘ लागल्याने वाघ थोडे अंतर चालून नदीपात्रात पडला व तिथेच मरण पावला, तर अन्य व्यक्तींच्या मते वाघ अज्ञात स्थळी मेला व नंतर त्याला नदीपात्रात फेकण्यात आले असण्याची चर्चा रंगली होती. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक वनसंरक्षक ( तेंदू) निखिता चौरे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, वनरक्षक नेवारे, केजकर करीत आहे.

Previous article*प्राचार्या सुनंदा पिदूरकर संघरत्न पुरस्काराने सन्मानित*
Next article*शहीद जवानांना वरोरावासियांची कँडल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली*