Home बड़ी खबरें नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू

नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू

85

*नाशिक रुग्णालय ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची माहिती*

शिवशक्ती टाइम्स न्यूज

नाशिक : नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.

या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.

दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

वॉल्वमध्ये लीकेज असल्याने गळती : राजेश टोपे

स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार? : प्रवीण दरेकर

नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्दैवी आहे. ही सर्वस्वी सरकारची चूक आहे, असं म्हणत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली. तसचं निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी घेणार असा सवालही विचारला. दरम्यान जबाबदार असणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

*तब्बल दोन तास रुग्ण ऑक्सिजनविना, रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप*

नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रकृती सुधारल्यानंतरही अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून तब्बल दोन तास ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता असा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.

Previous article1 जूननंतर हॉलमार्क असलेले सोने विकणे बंधनकारक, आता फक्त तीन दर्जांचे दागिनेच विकले जाणार
Next articleविरारमधील कोविड रुग्णालयाच्या icu विभागाला भीषण आग, 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू