Home चंद्रपूर  *वाट हरविलेल्या जख्मी चितळाला मिळाले जीवदान*

*वाट हरविलेल्या जख्मी चितळाला मिळाले जीवदान*

93

*वार्डातील जागरूक नागरिकांनी रेस्क्यू करुन वनविभागाच्या स्वाधीन केले*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : जंगलाची वाट हरविल्याने बुधवारच्या सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास जख्मी अवस्थेत चितळ प्रजातींचे हरीण शहरातील मोकाशी ले आउटमधील काळे यांच्या घराजवळ नागरिकांना आढळले. नागरिकांनी कुत्र्यापासून वाचवित या चितळाला रेस्क्यू करुन त्वरीत वनविभागाच्या स्वाधीन केले.
अधिक माहितीनुसार जंगलाचा मोठा भाग लागून असलेल्या वरोरा शहरातील शहीद बापूराव शेडमाके ( दत्त मंदिर) वार्डातील मोकाशी ले आऊट मधील काळे यांच्या घराजवळील नाली लगत चितळ प्रजातींचे हरीण स्थानीक नागरिकांना दिसले. बहुतेक कुत्र्यांनी पाठलाग करुन हमला केल्याने वाट विसरून ते गावांत शिरले व थकलेल्या अवस्थेत पाण्यासाठी नाली लगत बसलेले आढळले. वार्डात चितळ दिसल्याने नागरिकांत एकच खळबळ उडाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वार्डातील सुज्ञ नागरिकांनी स्थानीक वनविभागाशी संपर्क साधला व माजी नगरसेवक, सभापती छोटूभाई शेख यांनाही माहिती दिली. छोटूभाई तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी अन्य सामाजिक कार्यकर्ते अरुण उमरे, मनीष जेठानी, धनराज आसेकर, पवन रामटेके आदींनी यांनी जख्मी अवस्थेत असलेल्या चितळाला नाली जवळून उचलूण बाहेर काढण्यास भरीव सहकार्य केले. जंगलात आपसी झुंजीत चितळ जख्मी झाला असावा त्यात कुत्र्यांनी चितळाचा पाठलाग केल्याने अति धावल्याने थकलेल्या अवस्थेत चितळ गावांत शिरले असावे, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वार्डातील जागरूक नागरिकांनी छोटुभाई शेखच्या मदतीने रेस्क्यू करुन वनविभागाचे राऊंड ऑफिसर खोब्रागडे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यानंतर वनविभागाकडून सदर चितळावर उपचार करण्यात आल्याचे कळते. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून वेळीच सहकार्य केल्याने जख्मी चितळाला जीवदान मिळाले.