Home बड़ी खबरें *सुरेश गरमडे यांच्या सोयाबीन वाण संशोधनावर राष्ट्रीय पातळीवरून शिक्कामोर्तब*

*सुरेश गरमडे यांच्या सोयाबीन वाण संशोधनावर राष्ट्रीय पातळीवरून शिक्कामोर्तब*

98
*सोयाबीन वाणाचे हक्क नोंदणी प्रमाणपत्र बहाल झाल्याने शेतकऱ्यांत आनंद*
*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारच्या दिल्लीस्थित वनस्पती जातींचे संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणने वरोरा तालुक्याच्या वायगाव भोयर या गावातील प्रगतशील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांना त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोन अंगिकारून सोयाबीनचे एसबीजी – ९९७ हे वाण विकसित केल्याबद्दल वाणाला मान्यता देऊन कायदेशीररित्या शिक्कामोर्तब करीत हक्क नोंदणी प्रमाणपत्र बहाल केल्याने शेतकरी वर्गात कमालीचा आनंद पसरला असून गरमडे यांच्यावर सर्वच थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सुरेश बापूराव गरमडे यांच्याकडे वडिलोपार्जित १६ एकर शेती असून त्यातून ते विविध पिकांचे उत्पादन घेतात.खरीप हंगामात नगदी पीक म्हणून सोयाबीन लागवडीकडे त्यांचा कल असतो. सन २०१२ मध्ये जेव्हा गरमडे यांनी सोयाबीनचे पीक घेतले होते, त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतात २०० ते २५० शेंगा असलेली दोन रोपटी आढळली. त्यांनी कुतूहलवश त्या दोन रोपांना वेगळे करून त्यातील बियाणे पुढील हंगामात पेरले. अशाप्रकारे निवड पध्दतीने त्याच त्या बियाणांचा वापर ते करीत गेले.सन २०१७ मध्ये त्यांना एक एकरमध्ये रेकॉर्डब्रेक १७ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. ८० हजार रुपये उत्पादन खर्चात त्यांनी साडे चार लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळविले. तालुका स्तरावरील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांना वेळोवेळी यथोचित सहकार्य केले .मेहनत, चिकाटी, साहस आणि अनुभवाच्या जोरावर त्यांनी कृषी उत्पादनात नवीन कीर्तिमान स्थापित केल्याची यशकथा पत्रकार राजेंद्र मर्दाने यांनी राष्ट्रीय वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्याने विदर्भातील शेतकऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जिल्हा-अहमदनगर येथील सक्षम अधिकाऱ्यांनी या वाणाबाबत दिल्लीस्थित मुख्य कार्यालयाकडे पाठपुरावा केल्याचे सांगण्यात आले आहे. सलग तीन वर्षे सोयाबीन संशोधन केंद्रात या वाणाच्या चाचण्या घेण्यात आल्याचे व सदर वाण अन्य वाणांच्या तुलनेत सरस असल्याचे निदर्शनास आल्याचे नमूद केले गेले.या वाणाची चकाकी आणि रंग गळद असल्याने त्यास जास्त भाव मिळतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.गरमडे यांच्या म्हणण्यानुसार हे वाण वातावरण बदलास पूरक असून ‘ यलो मोझाईक ‘ रोगास प्रतिकारक आहे.या वाणांची रोपटी ७.५ सें.मी. पर्यंत वाढते.तीन ते चार दाण्यांच्या शेंगा सर्वाधिक असतात. इतर जातींच्या तुलनेत तेलाचे प्रमाणही जास्त आहे. उत्पादनात सातत्य राहिल्याने कृषी अधिकारीसुद्धा दंग झालेत.
सोयाबीनच्या एसबीजी – ९९७ या वाणाच्या नोंदणीसाठीचा सुरेश गरमडे यांचा अर्ज दि .२२ मे २०१८ रोजी दाखल झाला होता व दि. ७ जानेवारी २०२२ रोजी त्यांना नोंदणी प्रमाणपत्र बहाल झाले. सहा वर्षापर्यंत सदर वाणाची निर्मिती,विक्री,विपणन, वितरण, आयात – निर्यात चे कायदेशीर हक्क गरमडे यांना मिळाले असून नोंदणीचे नवीनीकरण करून ते पुढील नऊ वर्षापर्यंत हक्क अबाधित ठेऊ शकतील.
सोयाबीन पिकाचे नवीन वाण विकसित करून अशाप्रकारे नोंदणी प्रमाणपत्र मिळविणारे सुरेश गरमडे हे कदाचित पहिलेच शेतकरी असल्याने तालुक्याच्या यशात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
यासाठी गरमडे यांना प्राधिकरणाचे उपसचिव डॉ.एस.बी.गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, आत्मा संचालक रवींद्र मनोहरे, सोयाबीन संशोधक तथा माजी प्राचार्य मारोतराव पालारपवार, तत्कालीन कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी व्ही. प्रकाश, कृषी अधिकारी जयंत धात्रक, कृषी पर्यवेक्षक विजय काळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक घागी, प्रगतशील शेतकरी विनोद राऊत, श्रीकांत एकुडे आदींचे सहकार्य लाभले.
यापूर्वी नागभीड तालुक्‍याच्या नांदेड येथील दादाजी खोब्रागडे यांनी तांदळाची एचएमटी व अन्य भात जाती विकसित करून विदर्भाचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकविले होते. सुरेश गरमडे यांच्या रूपाने इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्रात क्रांती होऊ शकते व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने अच्छे दिन येऊ शकतील, असे मत कृषी अभ्यासक व्यक्त करीत आहेत.