Home चंद्रपूर  *तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या सवयींनी अकाली मृत्यूचा धोका*- *डॉ. राहुल पिंपळकर*

*तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या सवयींनी अकाली मृत्यूचा धोका*- *डॉ. राहुल पिंपळकर*

81

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : तंबाखूच्या सेवनामुळे मुखकर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. सातत्याने तंबाखू, गुटखा चघळल्याने तोंडाची त्वचा काळपट होते इथूनच कर्करोगाला सुरूवात होते. आपल्या तालुक्यात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने ‘ओरल सबमुकस फायबोसिस’ चे रुग्ण वाढत आहे. या सवयींवर वेळीच नियंत्रण न मिळविल्यास अकाली मृत्यूचा धोका निश्चित उद्भवेल, असा गंभीर इशारा वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील दंतशल्य चिकित्सक डॉ. राहुल पिंपळकर यांनी येथे दिला. भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा उपजिल्हा रुग्णालयात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत आयोजित सामुहिक गटचर्चेत ते बोलत होते.
कार्यक्रमात एसिडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिक दारूंडे, अधिसेविका वंदना बर्डे, परिसेविका सरस्वती कापटे यांची उपस्थिती होती.
डॉ. पिंपळकर पुढे म्हणाले की, अकाली मृत्यू रोखण्यासाठी नियमितपणे दात व मुख तपासणी करावी, तंबाखूजन्य सुपारी चघळणे, गुटखा, जर्दा, पानमसाला, खर्रा यापासून दूर राहणे आवश्यक आहे. जगात दरवर्षी ६० लाख व्यक्तिंचा मृत्यू हा तंबाखू सेवनाने होतो. तंबाखू सोडल्याने सामाजिक, आर्थिक लाभासोबतच स्वास्थ लाभही निश्चितच होतो. तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी जनजागृती करण्यासाठी या सामुहिक गटचर्चेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. दारूंडे यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने हृदय विकार, मायोकार्डियल इन्फेक्शन, इसोफेजिकल कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर इत्यादी रोग उद्भवून अकाली मृत्यू होण्याची दाट शक्यता असते, असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
सदर कार्यक्रमात तंबाखू व्यसनाधीनतेतून मुक्त झालेल्या व्यक्तींनी तंबाखूचे व्यसन जडलेल्या व्यक्तींना स्वानुभव सांगून दुष्परिणामांची जाणीव करून देत प्रबोधन केले, ही बाब फारच उल्लेखनीय ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आरोग्य सहाय्यक एस.एन.येडे, एनसिडी विभागाच्या नेहा इंदूरकर, तणिष्का खडसाने, किरण धांडे, सफाई कामगार दत्तू किन्नाके आदींनी परिश्रम घेतले.

Previous articleडॉ आगलावे यांनी ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेचा संदेश दिला- हंसराज अहीर
Next articleभारतीय कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभे तर्फे भद्रावतीत रास्ता रोको आंदोलन.